मुरलीधर मोहोळ यांचे २४x७ नागरी सेवा कार्यालय पुण्यात सुरू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १२ जुलै रोजी उद्घाटन होणार.
सायली मेमाणे
पुणे १२ july २०२५ : पुणे – नागरिकांना केंद्र, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सेवा, योजनांचे मार्गदर्शन आणि तात्काळ मदत एका ठिकाणी मिळावी, यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने ‘२४x७ नागरी सेवा कार्यालय’ पुण्यात सुरु होत आहे. हे कार्यालय जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी बागेसमोर सुरु करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १२ जुलै रोजी सायं. ३.३० वाजता होणार आहे.
या समारंभाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ यांच्या एका वर्षाच्या खासदारकीच्या कामाचा अहवाल बालगंधर्व रंगमंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशीत होणार आहे. याच वेळी त्यांनी कोरोना काळातील अनुभवावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन व दोन अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुण्यातील हा त्यांचा पहिला अधिकृत दौरा असून त्यांचे औपचारिक स्वागत होणार आहे.
हे कार्यालय संपूर्णतः संगणकीकृत असून, विविध विभागांसाठी स्वतंत्र काउंटरची सोय आहे. केंद्र शासन, राज्य शासन, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड मनपा, पीएमआरडीए व अन्य स्थानिक संस्थांशी संबंधित तक्रारी व सेवा या ठिकाणी सुलभ पद्धतीने हाताळल्या जातील. डिजिटल टोकन, ई-डॉक्युमेंट सबमिशन, व्हर्च्युअल सल्ला सेवा या सुविधांमुळे नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही.
प्रमुख सेवा विभागांत केंद्र व राज्य योजना मार्गदर्शन, नागरी विमान वाहतूक, सहकार, रेल्वे-तीर्थयात्रा मदत, महा ई सेवा केंद्र, नोकरी-स्वयंरोजगार सल्ला, वैद्यकीय सहाय्य, दिव्यांग सहाय्य केंद्र, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि कायदेविषयक सल्ला यांचा समावेश आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, “हे कार्यालय केवळ नागरी सेवा पुरवणारे नव्हे, तर नागरिकांच्या समस्या सोडवणारे आणि लोकशाहीला बळकटी देणारे आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही येथे विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.”
पुणे शहरातील हे पहिले २४ तास खुले असलेले डिजिटल नागरी सेवा कार्यालय असून, भविष्यातील जनसंपर्क कार्यालयांसाठी एक ‘मॉडेल’ ठरण्याची शक्यता आहे. एकाच छताखाली अनेक सेवा सुलभ पद्धतीने देण्याचा हा उपक्रम पुण्यातील नागरी प्रशासनात एक नवे पाऊल मानले जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter