• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

केएल राहुलने मोडला सईद अन्वर आणि सेहवागचा रेकॉर्ड; सुनील गावस्कर यांच्या यादीत नामावली

Jul 12, 2025
केएल राहुलचा ऐतिहासिक विक्रमकेएल राहुलचा ऐतिहासिक विक्रम

लॉर्ड्स कसोटीत अर्धशतक झळकावून केएल राहुलने सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवागला मागे टाकले. SENA देशांत १०+ ५०+ धावा करणाऱ्या आशियाई सलामीवीरांच्या यादीत सुनील गावस्करनंतर राहुलचा समावेश. संपूर्ण माहिती वाचा.

सायली मेमाणे

पुणे १२ जुलै २०२५ : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावर दमदार फॉर्ममध्ये आहे. सध्या लॉर्ड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतक ठोकून पुन्हा एकदा आपली दर्जेदार फलंदाजी सिद्ध केली आहे. या अर्धशतकासह केएल राहुलने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पाकिस्तानचा दिग्गज सलामीवीर सईद अन्वर आणि भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकत एक खास कामगिरी गाजवली आहे.

SENA देश म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया – या देशांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या आशियाई सलामीवीरांमध्ये राहुलचा आकडा आता ११वर पोहोचला आहे. या यादीत फक्त भारताचे लिजेंड सुनील गावसकर (१९) आणि श्रीलंकेचे डिमुथ करुणरत्ने (१२) राहुलच्या पुढे आहेत. यामुळे राहुलचा समावेश आता अशा निवडक खेळाडूंमध्ये झाला आहे ज्यांनी कठीण परकीय परिस्थितींमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताचा संघ ३ गडी गमावून १४५ धावांवर होता आणि अजूनही इंग्लंडच्या २४२ धावांनी पिछाडीवर आहे. राहुलची फलंदाजी पाहता, तिसऱ्या दिवशी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर राहुलने येथे शतक पूर्ण केले, तर भारताला सामन्यावर पकड मिळवता येऊ शकते. सध्या तो आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने इंग्लिश गोलंदाजांची परीक्षा घेत आहे.

केएल राहुल त्याच्या शांत, संयमी व क्लासी फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडमधील ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. विशेषतः सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या दिग्गजांना मागे टाकणे हे राहुलसाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे. भारतीय संघाच्या आगामी परदेश दौऱ्यांसाठी त्याची ही फॉर्म महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या पिढीत राहुलसारखा तंत्रशुद्ध सलामीवीर दुर्मीळ मानला जातो. त्याचा हा विक्रम केवळ वैयक्तिक नोंद नसून, टीम इंडियासाठी देखील प्रेरणादायक आहे. SENA देशांमध्ये मिळवलेले हे आकडे त्याच्या मेहनतीची आणि चिकाटीची साक्ष देतात. आता त्याच्याकडून आणखी मोठ्या खेळीची अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune