वडगाव मावळ येथे झालेल्या आरक्षण सोडतीत मावळमधील 103 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये तब्बल 48 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
सायली मेमाणे
पुणे १२ जुलै २०२५ : मावळ तालुक्यातील आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात पार पडली. एकूण 103 ग्रामपंचायतींसाठी ही सोडत काढण्यात आली असून त्यापैकी 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. दि. 11 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोडतीनुसार 10 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, तर उर्वरित 93 ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रातील आहेत. चिठ्ठ्याद्वारे आरक्षण ठरवण्यात आले असून ही चिठ्ठी वाचण्याचे काम चौथी इयत्तेतील विद्यार्थी ईशान अन्सारी आणि गणेश ढोरे यांनी पार पाडले. या प्रक्रियेमुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना कलाटणी मिळाली असून काहींनी यामुळे आनंद व्यक्त केला तर काहींनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
सावळा, वडेश्वर, इंगळून, कान्हे, तुंग, शिळींब, शिवणे, आंबी, कुसगाव प.मा., आढले बु., जांभुळ, करुंज, डोंगरगाव, औंढे खु., मळवली, करंजगाव, शिलाटणे, वरसोली, सांगवडे, केवरे, नाणोली, ओझर्डे, साळुंब्रे, साते, इंदुरी, डाहुली, निगडे, थुगाव, गोवित्री, घोणशेत, ठाकुरसाई, उकसान, आढे, वाकसाई, माळवाडी, येळसे, भोयरे, परंदवडी, तिकोणा, ताजे, वेहरगाव, नवलाख उंब्रे, आंबळे, लोहगड आणि पाचाणे या 48 ग्रामपंचायती स्त्रियांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
या आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गासाठी आरक्षित जागा स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण श्रेणीमध्ये आरक्षण वाटप करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार 13 जून 2025 ते 12 जून 2030 या कालावधीसाठी ही आरक्षण व्यवस्था लागू राहणार आहे.
या सोडतीमध्ये मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी, तलाठी कर्मचारी आणि निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या अंतिम यादीमुळे इच्छुकांनी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे कारण आरक्षण बदलामुळे मते विभागली जातील.
या आरक्षण प्रक्रियेमुळे महिलांना स्थानिक स्वराज्यात अधिकाधिक संधी प्राप्त होत असून मावळमधील महिला नेतृत्वासाठी ही संधी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte