Mumbai News: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ईमेलद्वारे RDX आणि IED बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. BSE इमारतीत स्फोट होणार असल्याचा दावा.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : Mumbai Bomb Threat: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (BSE) आज पहाटे एका अज्ञात ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली. या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की, BSE च्या टॉवर इमारतीत चार RDX बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि त्यांचा स्फोट दुपारी तीन वाजता होणार आहे. हा ईमेल ‘कॉम्रेड पिनारायी विजयन’ नावाच्या अकाउंटवरून पाठवण्यात आला होता. इमारतीत बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर बॉम्ब शोध पथक आणि मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण इमारतीची झडती घेण्यात आली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून BSE आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
या गंभीर घटनेनंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर सेलच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. ईमेल कोठून पाठवला गेला, याची माहिती मिळवण्यासाठी तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.
हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा देशात बॉम्ब धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. याच आठवड्यात अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला, दिल्लीतील सेंट थॉमस स्कूल आणि सेंट स्टीफन्स कॉलेजला देखील अशाच प्रकारच्या धमक्या ईमेलद्वारे मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातही घडामोडी घडल्या. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजारात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्सने २०३.९५ अंकांची उडी घेत ८२,४५७.४१ वर पोहोचला, तर निफ्टीने ६८.८५ अंकांची वाढ नोंदवली. सन फार्मा, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर एचसीएल टेक, झोमॅटो (इटरनल), टाटा स्टील यांचे शेअर्स घसरले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी १६१४.३२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १७८७.६८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter