Vaishnavi Hagawane Suicide Case: पुण्यातील गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट. पती, सासरच्या मंडळींसह ११ जणांविरोधात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल. पोलिसांकडून ठोस पुरावे सादर.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा, ११ आरोपींविरोधात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल
Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या गाजलेल्या प्रकरणात पुणे न्यायालयात सोमवारी एकूण ११ आरोपींविरोधात तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल ५८ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करत गंभीर आरोपांची पुष्टी केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. भुकूम, मुळशी) हिने १६ मे रोजी सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, सासरच्या मंडळींकडून हुंडा व जमीन खरेदीसाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात वैष्णवीच्या मुलाला बेकायदा ताब्यात घेणे, पिस्तूल दाखवून धमकावणे आणि आरोपींना आश्रय देण्याचे गंभीर आरोपही आहेत.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सर्व आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग पुराव्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात आला आहे. बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, काही आरोपींनी घटनांनंतर फरार आरोपींना आश्रय दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये प्रीतम पाटील, बंडू भेगडे, बंडू फाटक, अमोल जाधव व राहुल जाधव यांचा समावेश आहे. यापैकी पाच आरोपींना यापूर्वीच न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रमुख आरोपींपैकी लता हगवणे, करिश्मा हगवणे व निलेश चव्हाण यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. निलेशच्या अर्जावर १६ जुलैला तर लता व करिश्माच्या अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर आरोप निश्चिती होऊन खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे, कारण या प्रकरणाने स्त्रीविरोधी अत्याचार, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter