नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हनीट्रॅप प्रकरणाची तक्रार दाखल, ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग, राज्याच्या राजकारणात खळबळ.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : नाशिकमधून समोर आलेल्या एका खळबळजनक प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खडबड उडाली आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक दावा एका राजकीय नेत्याने नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी अनौपचारिक संवादात केला आहे. या प्रकरणामुळे नाशिक, मुंबई आणि पुण्यासह राज्यातील उच्चस्तरीय प्रशासनात खळबळ माजली आहे.
या प्रकरणातील एक महत्त्वाचा तपशील म्हणजे, नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेविषयी एका महिलेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सहभागाचे संकेत मिळत आहेत. त्यातच या प्रकरणाचे काही व्हिडिओही समोर आले आहेत, मात्र हे व्हिडिओ हनीट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनैतिक वर्तनाचे पुरावे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असून, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात गुप्त चर्चांना उधाण आले आहे.
हनीट्रॅप प्रकरणातील व्हिडिओमुळे अनेक अधिकारी आणि नेते सार्वजनिकपणे काही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. या गोष्टीवर उघडपणे प्रतिक्रिया देण्याऐवजी अनेकजण शांत राहण्याचा मार्ग पत्करत आहेत. ही गोष्टच प्रकरणाच्या गंभीरतेकडे इशारा करते. पोलिस तपासामध्ये समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील काही वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही राजकीय नेते या जाळ्यात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता, राजकीयदृष्ट्या देखील संवेदनशील ठरू शकते.
दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना हे प्रकरण समोर आल्यामुळे याचा राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष आणि माध्यमांकडून याप्रकरणात पारदर्शक तपासाची जोरदार मागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींमध्ये नेमके कोण आहेत, हे अजून अधिकृतरित्या स्पष्ट झालं नसल्यामुळे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रकरणात अजून कोणते नावं समोर येतात आणि यामागे नेमकं नेटवर्क किती खोलवर आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter