पुण्यात ॲप आधारित कॅब चालकांकडून मीटरप्रमाणे भाडे वसूल; प्रवाशांना अॅपवरील दरांपेक्षा अधिक रक्कम देण्याची सक्ती, आरटीओकडे तक्रारी वाढल्या.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुण्यात मोबाइल अॅपवरून सेवा देणाऱ्या कॅब चालकांकडून भाडेवसुलीतील मनमानी प्रवृत्तीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अलीकडे कॅब चालक अॅपवर दर्शवलेल्या निश्चित भाड्याव्यतिरिक्त मीटरप्रमाणे अतिरिक्त भाडे वसूल करत आहेत. ही रक्कम अधिक असल्याने प्रवासी आणि चालकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. या अनियमिततेमुळे विमानतळ परिसरात वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना दीर्घ वेळ थांबावे लागत आहे.
कॅब बुक करताना अॅपवर निश्चित भाडे दिसते. मात्र, प्रवासी गाडीत बसण्यापूर्वीच चालक फोन करून सांगतो की मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाईल. यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि अनेक वेळा चालक “तुम्हीच राईड रद्द करा” असे सांगून निघून जातो. अशा प्रसंगी प्रवाशांना दुसरी कॅब शोधण्यासाठी अधिक वेळ लागतो, आणि काहीवेळा गरजेमुळे अतिरिक्त पैसे देण्यावाचून पर्याय राहत नाही. यामुळे संतप्त प्रवाशांनी आरटीओ आणि वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या असून या मनमानीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आरटीओने वातानुकूलित कॅबसाठी २५ रुपये व सामान्य कॅबसाठी २१ रुपये प्रति किमीचा दर निश्चित केला आहे. परंतु अॅपवर भाडे निश्चित असूनही चालक त्याव्यतिरिक्त रक्कम मागत असल्यामुळे अनेक प्रवाशांना फसवणूक झाल्याचा अनुभव येतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक वा कुटुंबासोबत असलेल्या प्रवाशांना पर्याय नसल्याने ते जास्त भाडे देण्यास भाग पडत आहेत. काही प्रवाशांनी मोबाइल अॅपवर प्रत्यक्ष प्रतिकिलोमीटर दरच दर्शवावेत, अन्यथा अॅपवर भाडे दाखवूच नये अशी मागणी केली आहे.
या गोंधळात पुणे विमानतळ परिसरातील एरोमॉल समोरील वाहतूक व्यवस्था कोलमडत असून प्रवाशांना कॅब मिळवण्यासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागत आहे. यामुळे प्रवासात विलंब होतो आहे. प्रवाशांचे नुकसान होऊ नये म्हणून परिवहन विभागाने यामध्ये हस्तक्षेप करून अॅप कॅब सेवांवर कारवाई करावी, अशी मागणी वाढली आहे.
दरम्यान, या संदर्भात गिग कामगारांच्या संघटनांनीही आवाज उठवला आहे. ‘भारतीय गिग कामगार मंच’ व ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, ओला, उबर, स्विगी, झोमॅटो आदी प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या हजारो गिग कामगारांनी राज्यभरातून आझाद मैदानात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील हजारो कामगारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत आणि सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे, असा त्यांचा आरोप आहे.
हा भाडेवसुलीचा प्रकार नुकताच सुरू झाल्याने त्यावर नियंत्रण आणण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना योग्य आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने त्वरीत यामध्ये हस्तक्षेप करून सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी, अन्यथा प्रवाशांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter