• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे दौंडमध्ये ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या नगररचना सहाय्यकावर गुन्हा दाखल

Jul 24, 2025
पुणे दौंडमध्ये ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या नगररचना सहाय्यकावर गुन्हा दाखल पुणे दौंडमध्ये ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या नगररचना सहाय्यकावर गुन्हा दाखल

पुणे पेट्रोलपंप परवानगी मिळवून देण्यासाठी ३.५० लाखांची लाच मागणाऱ्या दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहाय्यकाविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरीविरोधातील ही मोठी कारवाई ठरली आहे.

सायली मेमाणे

पुणे २४ जुलै २०२५ : पुणे: पेट्रोलपंप परवानगी मिळवून देण्यासाठी ३.५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहायक विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका ३६ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सदर तक्रारदाराने बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोलपंप डीलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी जमीन लालचंद लुंड (वय ७३) यांच्या मालकीची असून तक्रारदाराने ती २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतली होती. एनए परवानगी व बांधकाम परवाना मिळवण्यासाठी लुंड यांनी २ जानेवारी रोजी नगररचना विभागात अर्ज सादर केला होता.

लुंड यांचे वय लक्षात घेता त्यांनी तक्रारदाराला अधिकृत प्रतिनिधी म्हणून अधिकृत केलं. त्यानंतर ३ जानेवारी रोजी नगररचना सहायक हावशेट्टे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि आवश्यक अहवाल तयार केला. परंतु त्यांनी टेन्टेटिव्ह लेआउट, फायनल लेआउट आणि परवाने मिळवून देण्यासाठी सुरुवातीला चार लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ३.५० लाख रुपयांवर आली. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तपास अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, हावशेट्टे यांनी लाच मागितल्याचे पंचासमोर स्पष्ट झाले.

यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे हावशेट्टे यांनी ही लाच रक्कम स्वतःसाठी आणि तत्कालीन मुख्याधिकारीसाठी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणात केवळ एकाच व्यक्तीचा नव्हे, तर अधिकाऱ्यांचा संगनमताचा संशय निर्माण झाला आहे. हावशेट्टे यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. पुण्यातील सरकारी कामकाजात लाच मागण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune