वाशीतील महाविद्यालयात केवळ मराठी बोलल्यामुळे २० वर्षीय विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने अमानुष मारहाण. आरोपीविरोधात गुन्हा दाखल, मनसेची कारवाईची तयारी.
सायली मेमाणे
पुणे २४ जुलै २०२५ : राज्यात मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसतोय. नुकतीच कल्याणमध्ये मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय युवकाने मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता वाशीतील महाविद्यालयात मराठी विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकसह अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फक्त मराठी बोलल्यामुळे वर्गातील अन्य विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सूरज पवार या २० वर्षीय मराठी विद्यार्थ्याचा त्याच कॉलेजच्या वर्गमित्र फैजान नाईकसोबत WhatsApp ग्रुपवर मराठी-अमराठीच्या मुद्यावरून शाब्दिक वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान सोमवारी दुपारी थेट मारहाणीत झाले.
महाविद्यालयाच्या गेटवर फैजान व त्याचे तिघेजणांनी सूरजला अडवले आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी, तसेच हॉकी स्टिकने मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी सूरजला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वाशी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यामध्ये उडी घेतली असून, मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते वाशी पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भाषेवरून वाढणारी दरी ही चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे अशाच प्रकारचा एक प्रकार काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये घडला होता.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात एका मराठी रिसेप्शनिस्ट मुलीला बाल चिकित्सालयात आलेल्या परप्रांतीय तरुणाने केवळ मराठीत संवाद केल्यामुळे अमानुष मारहाण केली होती. संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत संबंधित तरुणीला मानेवर लाथ मारण्यात आली होती, तसेच केस ओढून जबर मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूणच राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वादाची तीव्रता वाढत चालली आहे आणि त्याचे पडसाद आता शैक्षणिक संस्थांमध्येही उमटत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter