• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

WWE सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन: कुस्तीविश्वातील ग्लॅमरस आयकॉन काळाच्या पडद्याआड

Jul 25, 2025
WWE सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन: कुस्तीविश्वातील जगप्रसिद्ध आयकॉनचं अंत WWE सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन: कुस्तीविश्वातील जगप्रसिद्ध आयकॉनचं अंत

हल्क होगन यांचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन. WWE ला ग्लोबल लोकप्रियता मिळवून देणारा पिळदार शरीरयष्टीचा सुपरस्टार आता काळाच्या पडद्याआड.

सायली मेमाणे

पुणे २५ जुलै २०२५ : जगप्रसिद्ध WWE सुपरस्टार आणि ९० च्या दशकातील लाखो तरुणांच्या आयडॉल असलेले हल्क होगन यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. टेरी बोलिया हे त्यांचं मूळ नाव असून, जगभरातील कुस्तीप्रेमींना ते हल्क होगन या नावाने परिचित होते. ७१ वर्षांचे असलेले होगन यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. गुरुवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हल्क होगन यांची ओळख केवळ WWE मध्ये दमदार परफॉर्मन्स करणाऱ्या पैलवान म्हणून नव्हती, तर ते एक पॉप कल्चर आयकॉन देखील होते. १९८० आणि ९० च्या दशकात त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांच्या पिळदार शरीरयष्टी, पिवळा आणि लाल पोशाख, डोळ्यांवर गॉगल आणि मिशी अशा खास स्टाईलमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनावर राज्य करत होते. त्यांचं प्रसिद्ध घोषवाक्य “Say Your Prayers, Eat Your Vitamins” हे आजही चाहत्यांच्या मनात कोरलेलं आहे.

हल्क होगन यांनी WWE मधील अनेक ऐतिहासिक सामने गाजवले. विशेषतः रेसलमेनिया ३ मध्ये त्यांनी आंद्रे द जायंट विरोधात लढलेला सामना अविस्मरणीय ठरला. त्या सामन्याला ९३,००० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी थेट उपस्थित राहून पाहिलं होतं, जे आजही WWE इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्येच्या सामन्यांपैकी एक मानलं जातं.

फक्त रिंगमधील परफॉर्मन्सच नव्हे, तर त्यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. त्यामुळे ते एक सर्वांगीण सेलिब्रिटी बनले. त्यांच्या नावावर स्टिकर्स, फिगर्स, टीशर्ट्स यासारख्या वस्तू जगभरात विकल्या गेल्या.

हल्क होगन यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली. त्यांनी दोन लग्नं केली होती. पहिली पत्नी लिंडासोबत त्यांना दोन मुलं – ब्रुक आणि निक – आहेत. २००७ मध्ये त्यांचं घटस्फोट झालं. त्यानंतर त्यांनी जेनिफर मॅडॅनियलशी विवाह केला, परंतु २०२२ मध्ये हे नातं देखील संपुष्टात आलं.

WWE ने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. “हल्क होगन यांनी १९८० आणि ९० च्या दशकात WWE ला जागतिक स्तरावर पोहचवलं. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत,” अशी भावना WWE च्या अधिकृत निवेदनात व्यक्त करण्यात आली.

हल्क होगन यांचं निधन म्हणजे फक्त एका कुस्तीपटूचा मृत्यू नव्हे, तर एक युग संपल्यासारखं वाटतं. त्यांनी लाखो चाहत्यांना प्रेरणा दिली, मनोरंजन दिलं आणि WWE ला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. त्यांच्या आठवणी, सामन्यांचे क्षण आणि दिलेलं प्रेरणादायी घोषवाक्य यामुळे ते नेहमीच लक्षात राहतील.


Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune