नितेश राणे यांच्याविरोधात कोर्टाचे वॉरंट; संजय राऊत यांच्या तक्रारीवर सुनावणी २ जूनला
सायली मेमाणे,
पुणे १७ मे २०२५ : मुंबईतील माझगाव न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, राणे हे न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २ जून रोजी होणार आहे.
या महिन्यातील राणे यांच्याविरोधात हे दुसरे वॉरंट असून, यापूर्वीही त्यांनी न्यायालयीन हजेरी टाळल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. संबंधित खटला २०२३ मधील आहे, ज्या वेळी नितेश राणे यांनी सार्वजनिकरित्या संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी राऊत यांना ‘साप’ संबोधले होते आणि ते लवकरच ठाकरे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही केला होता.
या वक्तव्यामुळे दुखावलेल्या संजय राऊत यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी राणे यांच्या विधानांना खोटं आणि बदनामीकारक ठरवत न्यायालयाकडून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. आता नव्याने वॉरंट बजावण्यात आल्याने राणे यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
संजय राऊत यांच्यावरील कथित अपमानजनक वक्तव्याच्या प्रकरणात मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात मझगाव कोर्टाने जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. पुढील सुनावणी २ जूनला होणार आहे.
संजय राऊत यांच्यावरील कथित अपमानजनक वक्तव्याच्या प्रकरणात मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात मझगाव कोर्टाने जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. पुढील सुनावणी २ जूनला होणार आहे