• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

डेटिंग अ‍ॅपवरून समलैंगिक तरुणांना गंडवणारी टोळी जेरबंद; धमकी देत पैसे लुबाडले

May 21, 2025
डेटिंग अ‍ॅपवरून समलैंगिक तरुणांना ब्लॅकमेल करणारी टोळीडेटिंग अ‍ॅपवरून समलैंगिक तरुणांना ब्लॅकमेल करणारी टोळी

छत्रपती संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांना गंडवणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात. बनावट प्रोफाइल, ब्लॅकमेल आणि मारहाण करत उकळले पैसे. ९ महिन्यात १०हून अधिक तरुण फसवले.
सायली मेमाणे,

पुणे २१ मे २०२४ : छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणात समलैंगिक डेटिंग अ‍ॅपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणारी टोळी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. ही टोळी ‘वल्ला’ नावाच्या डेटिंग अ‍ॅपवर बनावट प्रोफाईल तयार करून समलैंगिक तरुणांशी मैत्री करत असे आणि नंतर त्यांना एकांत ठिकाणी बोलावून ब्लॅकमेल करत पैसे उकळत असे. दौलताबाद पोलिसांनी तिघांना अटक केली असून या टोळीने गेल्या नऊ महिन्यांमध्ये किमान १० तरुणांना अशा प्रकारे फसवल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवम पवार (२३), आयुष लाठे (२१), आणि राहुल खांडेकर (२१) अशी असून तिघेही शिक्षण घेत असतानाच या गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी प्रथम वल्ला अ‍ॅपवर आकर्षक बनावट प्रोफाईल तयार करून समलैंगिक तरुणांचा विश्वास संपादन केला. नंतर पीडित तरुणाला निर्जन ठिकाणी बोलावून इतर दोन साथीदारांसह त्याला मारहाण केली आणि त्या घटनेचे चित्रीकरण केले. त्यानंतर ‘तुझे समलैंगिक व्हिडिओ व्हायरल करतो’ अशी धमकी देत त्याच्याकडून रोख रक्कम उकळण्यात आली.

या प्रकरणात एका पीडित तरुणाने हिंमत दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून तात्काळ कारवाई करत दौलताबाद पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. प्राथमिक चौकशीत या टोळीने एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हे, तर इतर भागांमध्येही समलैंगिक तरुणांना लक्ष्य करून फसवणूक केल्याचे संकेत आहेत. आतापर्यंत चार पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून खरे प्रमाण यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपींपैकी राहुल बीएस्सीचा विद्यार्थी असून, इतर दोघं नर्सिंग शिक्षण घेत आहेत. या वयात समाजातील एक संवेदनशील घटक असलेल्या LGBTQ समुदायाला लक्ष्य करत गुन्हेगारी मार्ग निवडल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासारख्या प्रकरणांमुळे ऑनलाईन डेटिंग सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त होत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.