पुण्यात मान्सूनपूर्व पूर सज्जतेसाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना; धरणातून पाणी सोडण्यापूर्वी महापालिकेला माहिती, आरोग्य आणि वाहतूक यंत्रणाही सज्ज.
सायली मेमाणे,
पुणे २५ मे २०२५. :पुणे शहरात दरवर्षी पावसाळ्यात धरणांतून पाणी सोडल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता यंदा प्रशासनाने अधिक तयारीला सुरुवात केली आहे. मागील वर्षी अचानक धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्यामुळे काही भागात पाणी शिरले होते. यंदा अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक यंत्रणेला ठोस सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणांमधून नदीत किती प्रमाणात पाणी सोडले तर शहरातील कोणते क्षेत्र प्रभावित होऊ शकते, याची सविस्तर माहिती महापालिकेला पुरवण्यात आली आहे. संभाव्य धोक्याची आणि सावधतेची पातळी निश्चित करण्यात आली असून, त्या आधारे पूरनियंत्रणाची रणनीती ठरवली जात आहे.
नद्यांच्या काठावर असलेल्या वसाहतींमध्ये पूररेषा स्पष्टपणे दर्शविणे, अतिक्रमण काढून टाकणे आणि नदीपात्रातील अडथळे दूर करणे यावर भर दिला गेला आहे. यासोबतच धरणांमधून पाणी सोडण्याआधी संबंधित विभागांनी वेळेवर इतर यंत्रणांना माहिती देणे आवश्यक ठरवले आहे.
महानगरपालिकेने ड्रेनेज व नालेसफाईची कामे पावसाआधीच पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रो प्रकल्प, तसेच रस्त्यांच्या कामामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, तेथे पर्यायी व्यवस्था आणि गार्ड तैनात ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
आरोग्य विभागालाही आपत्तीच्या काळात तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक तयारी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णालयांतील बेड्स, औषधे, रुग्णवाहिका, रक्तपेढी आणि डॉक्टरांची उपस्थिती यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. सर्पदंशाच्या घटना वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन विषरोधी लसींचा साठा वाढवण्यासही सूचित करण्यात आले आहे.
या सर्व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व संबंधित विभाग प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. कोणताही विभाग दुर्लक्षित राहू नये म्हणून यावेळी प्रत्यक्ष प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक केली आहे.