• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

मुंबईच्या समुद्रात सापडला तेल व गॅसचा मोठा साठा; भारताच्या इंधन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

May 26, 2025
मुंबई तेल व गॅस साठा मुंबई तेल व गॅस साठा

ओएनजीसीला मुंबई ऑफशोअरमध्ये मोठा तेल आणि नैसर्गिक गॅसचा साठा सापडला असून, भारताच्या इंधन आयातावरची अवलंबनता कमी होणार आहे.
सायली मेमाणे,

पुणे २५ मे २०२५. : भारताला इंधनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, ओएनजीसीने मुंबईच्या अरबी समुद्रातील ऑफशोअर बेसिनमध्ये तेल आणि नैसर्गिक गॅसचे मोठे साठे शोधून काढले आहेत. या शोधामुळे देशाच्या इंधन स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. ओपन अ‍ॅक्रेज लायसेंसिंग पॉलिसी (OALP) अंतर्गत करण्यात आलेल्या संशोधनात दोन वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये तेल आणि गॅसचे साठे सापडले आहेत. MB-OSHP-2020/2 या ब्लॉकमध्ये ‘सूर्यमणी’ नावाचा साठा आणि MB-OSHP-2018/1 या ब्लॉकमध्ये ‘वज्रमणी’ नावाचा साठा सापडला आहे. या साठ्यांमधून रोज हजारो बॅरल तेल आणि लाखो क्यूबिक मीटर गॅसचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. सूर्यमणी ब्लॉकमधील विहीरीतून दररोज अंदाजे 2,235 बॅरल तेल आणि 45,181 क्यूबिक मीटर गॅस उत्पादन होईल. त्याच ब्लॉकमधील दुसऱ्या विहीरीतून सुमारे 413 बॅरल तेल आणि 15,132 क्यूबिक मीटर गॅस मिळेल. वज्रमणी ब्लॉकमधील विहीरीतून 2,122 बॅरल तेल आणि 83,120 क्यूबिक मीटर गॅस दररोज उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई ऑफशोअर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे तेल व गॅस उत्पादन क्षेत्र असून बॉम्बे हाय, बसीन, नीलम आणि पन्ना-मुक्ता या विहीरी देशाला मोठ्या प्रमाणात इंधन पुरवतात. बॉम्बे हायमधूनच दररोज 1.34 लाख बॅरल तेल आणि 10 मिलियन क्यूबिक मीटर गॅसचे उत्पादन होते. याशिवाय, कृष्णा-गोदावरी म्हणजेच केजी बेसिनच्या यंदापल्ली-1 या ऑनलँड ब्लॉकमध्ये देखील तेल व गॅसचे साठे सापडल्याचे प्राथमिक संकेत आहेत. सध्या भारत आपल्याला लागणाऱ्या इंधनाच्या सुमारे 85 टक्के गरज आयात करत असून, या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे देशाच्या इंधन सुरक्षेचा पाया अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तथापि, या साठ्यांचा प्रत्यक्ष उत्पादनात उपयोग होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.