चाकण ग्रामीण रुग्णालयात वितरित केलेल्या एस्पिरिन गोळ्यांवरील FDA तपासणीत गंभीर दोष आढळले. गोळ्या ठिसूळ व निकृष्ट प्रतीच्या असल्याचे निष्कर्षात नमूद.
सायली मेमाणे,
पुणे : २९ मे २०२५ : चाकण रुग्णालयात FDA चा एस्पिरिन गोळ्यांवर आक्षेप घेतल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या औषध वितरण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षणात ही बाब समोर आली असून, संबंधित गोळ्या दर्जाहीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२३ एप्रिल रोजी झालेल्या या तपासणीत, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. ही तपासणी औषध निरीक्षक मनोज एन. आय्या यांच्या नेतृत्वाखाली झाली. तपासणी दरम्यान ‘Opirin-75’ या नावाने वितरित होणाऱ्या Aspirin 75 mg गोळ्यांचा साठा आढळून आला. सदर औषधाचा बॅच क्रमांक 23K-T2727 असून, उत्पादन कंपनी हिमाचल प्रदेशातील ओरिसन फार्मा इंटरनॅशनल ही आहे.
साठा आणि रेकॉर्ड्स सुरुवातीला व्यवस्थित असल्याचे दिसून आले. मात्र नमुन्याची तपासणी औरंगाबादच्या शासकीय प्रयोगशाळेत करण्यात आली आणि त्यानंतर धक्कादायक निष्कर्ष समोर आले. तपासणी अहवालानुसार, गोळ्या ठिसूळ असून त्यांचा पृष्ठभाग खडबडीत होता. अशा अवस्थेतील गोळ्यांमुळे औषधाच्या प्रभावावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.
सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची औषधे वापरली जात असल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित बॅच मधील गोळ्या जिल्हा औषध साठा केंद्र, औंध, पुणे येथून ६ जून २०२४ रोजी चाकण रुग्णालयात पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या चाचणीचा निकाल अत्यंत गंभीर असून, या बॅचचा वापर तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
FDA ने उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून खुलासा मागवला असून, यासंबंधीच्या साखळीतील इतर घटकांची चौकशीही सुरू केली आहे. याशिवाय इतर सरकारी रुग्णालयांमध्ये देखील या बॅचचे वितरण झाले आहे का, याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
सार्वजनिक आरोग्य योजनांतर्गत वितरित होणाऱ्या औषधांमध्ये गुणवत्तेचा समावेश हा अत्यावश्यक घटक आहे. एकही त्रुटी शेकडो रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा प्रकरणांना गांभीर्याने घेतले जात असून, यासाठी जबाबदार घटकांवर कारवाई केली जाईल, असे संकेत FDA च्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या प्रकारामुळे राज्यातील औषध नियंत्रण प्रक्रियेची कार्यपद्धती पुन्हा तपासली जात आहे. यापुढील काळात अशा त्रुटी टाळण्यासाठी औषध साठ्याच्या चाचण्या नियमित घेण्याचे नियोजन अधिक काटेकोर करण्यात येणार आहे.