• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

सिंहगड रोड उड्डाणपूल ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास; पीएमसीकडून वाहतुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात

Jul 24, 2025
पुणे सिंहगड रोड उड्डाणपूल ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास; पीएमसीकडून वाहतुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यातपुणे सिंहगड रोड उड्डाणपूल ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास; पीएमसीकडून वाहतुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात

पुणे महानगरपालिकेचा सिंहगड रोड उड्डाणपूल प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, फनटाइम थिएटर ते विठ्ठलवाडीपर्यंतचा संपूर्ण मार्ग ऑगस्ट २०२५ च्या मध्यपर्यंत नागरिकांसाठी खुला होणार आहे. ११८ कोटींच्या खर्चाने उभारलेला हा २.५ किमी लांब पूल वाहतूककोंडी सोडवणार.

सायली मेमाणे

पुणे २४ जुलै २०२५ : सिंहगड रोड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; ऑगस्ट मध्यापर्यंत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार

पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या कामाचा शेवटचा टप्पा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नारवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचा संपूर्ण मार्ग येत्या ऑगस्ट २०२५ च्या मध्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा मार्ग सुरू झाल्यानंतर फनटाइम थिएटरपासून विठ्ठलवाडीपर्यंत प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

सुमारे २.५ किमी लांबीचा असलेला हा दुहेरी उड्डाणपुल ₹११८ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. हा पुल शहरातील एक दीर्घ उड्डाणपुल मानला जातो. सततच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. २१ सप्टेंबर २०२१ रोजी याचे काम सुरू करण्यात आले.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात इनामदार चौक ते फनटाइम थिएटर या भागाचा उड्डाणपुल १ मे २०२५ रोजी नियोजित वेळेपेक्षा आधीच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. दुसरा टप्पा – माणिकबाग ते विठ्ठलवाडी – डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार होता. मात्र काम वेगाने झाल्यामुळे आता अंतिम टप्पाही लवकरच पूर्ण होत आहे.

फनटाइम थिएटरकडून इनामदार चौकाच्या दिशेने जाणाऱ्या तिसऱ्या टप्प्याचे कामही PMC ने जुलै महिन्यात सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या बाजूचे डांबरीकरण आणि काँक्रीटिंगचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, आता केवळ किरकोळ कामे बाकी आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे थोडा विलंब झाला असला तरी PMC अधिकारी पुढील दोन आठवड्यांत सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हणाले आहेत. PMC चे अतिरिक्त आयुक्त प्रितीराज बी. पी. आणि प्रकल्प प्रमुख दिनकर गोजरे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली.

उड्डाणपुलाच्या रॅम्प आणि खालच्या मार्गाचे काँक्रीटिंग देखील पूर्ण झाले आहे. आता केवळ किरकोळ कामे बाकी असून महापालिका लवकरच संपूर्ण उड्डाणपुल प्रवाशांसाठी खुला करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, कर्वेनगर ते सनसिटी पूलासाठीची जमीन संपादनाशी संबंधित अडचणीही आता निकाली निघाल्या असून, संबंधित प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे PMC च्या वतीने सांगण्यात आले.

तथापि, उड्डाणपुल असूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. PMC आणि वाहतूक पोलीस यांनी अनेक उपाययोजना करूनही, विशेषतः गर्दीच्या वेळेत कोंडी होत आहे. तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर विठ्ठलवाडी चौक व पेट्रोल पंप परिसरात नवीन कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तेथील पदपथ अरुंद करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune